साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील सर्वच विरोधक नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविदयालयात झालेल्या घटनेचा निषेध करीत असतांना पुन्हा एकदा या महाविदयालयात गेल्या २४ तासात अजून १५ जणांचा मृत्यू झालाय. यात ६ अर्भक, २ बालकांचा समावेश. गेल्या ७ दिवसात ८३ मृत्यूची नोंद झालीय. त्यात ३७ अर्भक आणि बालकांचा समावेश.
या शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांनी या रुग्णालयाला भेट देत सरकारवर निशाणा साधला होता. परंतु या रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या रुग्णालयात २४ तासात पुन्हा १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
२ ऑक्टोबर – २४ तासात २४ मृत्यू यात १२ नवजात अर्भक
३ ऑक्टोबर – २४ तासात ७ मृत्यू त्यात ४ अर्भक
४ ऑक्टोबर – २४ तासात ६ मृत्यू त्यात २ अर्भक
५ ऑक्टोबर २४ तासात १४ मृत्यू त्यात ५ अर्भक
६ ऑक्टोबर – २४ तासात ११ मृत्यू त्यात ४ अर्भक
७ – ऑक्टोबर – २४ तासात ६ मृत्यू १अर्भक ,१ बालकाचा समावेश
८ ऑक्टोबर – २४ तासात १५, मृत्यू ६ अर्भक , २ बालकं
गेल्या सात दिवसात एकूण ८३ जणांचा मृत्यू झालाय. यात ३७ अर्भक , लहान बालकांचा समावेश
शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तर उच्च न्यायालयानं देखील सरकारला खडेबोल सुनावलेत. “राज्यात आरोग्य सेवेवर मनुष्यबळ कमतरतेचे दडपण आहे असे उत्तर देऊ नका, अशा शब्दात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची कानउघडणी न्यायालयानं केलीय. राज्य सरकार या नात्याने जनतेला मुलभूत सेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.