साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | देशभरात खुनाच्या घटना वाढत असतांना पुन्हा एकदा देशाची राजधानी नवी दिल्ली एका क्रूर घटनेने हादरली असून अवघ्या ३५० रुपयांसाठी एका अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाच्या शरीरावर जवळपास ६० वार आरोपीने केले असून दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत मंगळवारी रात्री ११.१५ वाजता एका पीसीआर कॉलवर माहिती मिळाली की जनता येथे दरोडा टाकताना एका अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठलं आणि पीडित तरुणाला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत तरुणाच्या शरीरावर ६० हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडित तरुणाचे तोंड दाबले, त्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर त्याने तरुणावर चाकूने वार करून त्याच्याकडील ३५० रुपये हिसकावले. घटनेच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हत्येमागे लुटमार हेच कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.