साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जन करीत असताना रमेश भिका चव्हाण (४०) हा इसम तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला. घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. रात्रीपर्यंत इसमाचा शोध लागला नाही.
वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईचे विसर्जन झाले व नंतर चव्हाण हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले. या विषयी जिल्हा दूध संघाचे संचालक रमेश जगन्नाथ पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रशासनाला माहिती दिली. नायब तहसीलदार दिलीप बारी व त्यांचे सहकारी तसेच म्हसावद पोलिस चौकीचे पोकॉ हेमंत पाटील, प्रदीप पाटील हे घटनास्थळी पोहचले. इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र ते न सापडल्याने सकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक जाणार आहे.