साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३| चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील एका बँकेतून बाहेर पडलेल्या इसमाच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी दुपारी १.५० वाजता घडली. दरम्यान या घटनेतील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (५७) यांनी बडोदा बँकेतून ३ लाखाची रक्कम काढली. बाहेर आल्यावर त्यांनी मोटारसायकलच्या मागील सीटच्या कडीला प्लॅस्टिक पिशवी लावली. काही वेळाने ही तीन लाख रुपये असलेली ही पिशवी लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या फुटेजमध्ये एक जण डोक्याला बागायतदार रूमाल बांधून मोटारसायकलवर बसलेला त्याचा दुसरा साथीदार पैशांची पिशवी घेवून मोटारसायकलवरुन पसार झाल्याचे आढळून आला.