साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | देशात सुरु असलेल्या महागाईचा आता ग्राहकांना मोठा फटका बसू लागला आहे. त्यात गेल्या काही महिन्यापासून स्वस्त असलेले सोन्याने अचानक वाढ झाल्याने ग्राहकांची गर्दी बाजारातून कमी झाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. मे नंतर सोने पुन्हा एकदा ६२ हजारांच्या पुढे गेले आहे. चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाली व ती ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
विजयादशमीच्या पूर्वीपासून सोने- चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली मात्र शुक्रवारी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी त्यात थेट ६०० रुपयांची वाढ झाली व ते ६२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. यापूर्वी ५ मे २०२३ रोजी सोने ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते दुसरीकडे चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाल्याने ती तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा ७३ हजारांवर पोहचली. शनिवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८३.४१ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोने- चांदीच्याही भावात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.