साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून हिंदी व मराठी मनोरंजन विश्वातून नेहमीच दुर्देवी बातमी येत असतांना आज पुन्हा एकदा अशीच बातमी समोर आली आहे. धूम आणि धूम २ या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. दि.१९ नोव्हेबर रविवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. संजय गढवी यांच्या निधनाने हिंदी सिने जगतावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडवाला बॅकरोड येथे संजय गढवी हे सकाळी फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले. दिग्दर्शक संजय गढवी यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. 19 नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.