साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | राज्यातील शिवसेना ठाकरे गटातील काही नेत्यांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला.
बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन करण्यात आले.
पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस स्थानकात रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी दाखल झाले होते. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात आले होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन, चार दिवसांत काम पूर्ण करुन ही मार्गिका सुरु करणार होतो, अशी भूमिका मुंबई मनपाने घेतली आहे.