साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक भागातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहे. त्यातच अनेक दिवसापासून पोलिसांच्या छाप्यात ड्रग्जचा साठा देखील हाती लागत असतांना एक खळबळजनक घटना चिंचोळी औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिसांच्या हाती लागले आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील एका कंपनीवर मुंबई पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अचानक छापा टाकून १६ कोटी रुपयांचे ८ किलो एमडी ड्रग्जचा साठा आणि निर्माणाधीन मेफेड्रोनचा कच्चा साठा जप्त केला. या प्रकरणी राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी या सख्ख्या भावांना अटक केली आहे. दोघेही पूर्वी केमिकल कंपनीत काम करायचे.
काही वर्षांपासून कंपनी बंद पडली होती. मात्र तिथे ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत सोलापूर ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती. काही वर्षांपूर्वी याच चिंचोळी एमआयडीसीतील एका कंपनीवर ड्रग्जप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांना अटक करून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला होता. यात अनेक बड्या नेत्यांसह सिनेसृष्टीतील लोकांची नावे समोर आली होती..