साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात बनावट नोटा चालविल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एक लाखाच्या बनावट नोटासाठी ३५ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा कर्णपुरा यात्रा, मेडिकल तसेच किराणा दुकानातून चलनात आणणाऱ्या सात भामट्यांना गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४१९ नोटा जप्त केल्या असून ९० हजार रुपयांच्या १८१ बनावट नोटा बाजारपेठेत आहेत. अटक केलेल्या सातपैकी ५ जण विधिसंघर्षग्रस्त मुले असून मुख्य सूत्रधार फरार झाला आहे. अल्पवयीन मुलांना हाताशी धरून बिनबोभाटपणे हा उद्योग सुरू होता.
मुकुंदवाडी ठाण्याच्या विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने मुकुंदवाडी भागातच ही कारवाई केली. टोळीने २४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान ६०० नोटा बाजारात चालवल्या. विशेष म्हणजे एकाही दुकानदाराच्या लक्षात बनावटपणा आला नाही. मात्र, एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यावर हालचाली सुरू झाल्या. आरोपींमध्ये पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांसह देवेंद्र ऊर्फ भय्या मोरे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी कमान परिसर) आणि राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर, गारखेडा परिसर) यांचा समावेश आहे. त्यांना एक नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर यांच्या सूचनेवरून २७ ऑक्टोबर रोजी पोलिस पथकाने देवेंद्र मोरेसह पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.