साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील महसूल व पोलीस विभागात गेल्या काही महिन्यापासून लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या लाचखोरीला आळा लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नेहमीच कारवाई करीत असतात. नुकतेच सोलापूर शहरातील वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.
सोलापुरातील कारवाईमधील वाहन सोडण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेताना सोलापूर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. श्रीकांत बलभीम जाधव (वय-51 रा. सोलापूर) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोलापूर एसीबीनं ही कारवाई गुरुवारी (दि.12) दुपारच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरात केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सोलापूर शहर पोलीस दलात अनेक वर्षापासून पोलीस अंमलदार म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. दोन-तीन दिवसांपूर्वी श्रीकांत जाधव यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई केली होती. या कारवाईतील वाहन सोडवण्यासाठी जाधव यांनी 2700 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत सोलापूर एसीबी कार्यालयात तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पीएसआय जाधव यांनी गाडी सोडवण्यासाठी 2700 रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी दुपारी वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडून 2700 रुपये घेऊन 700 रुपयांची ऑनलाईन पावती केली. राहिलेली दोन हजाराची रक्कम लाच म्हणून स्वत:कडे ठेवली. लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर एसीबीच्या पथकाने केली.