साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील अपघाताची घटना ताजी असतांना आज पुन्हा एकदा सकाळी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत.
मिळालेल्य माहितीनुसार, धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी बस चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळ जुन्या मोरावर बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. बस पलटी झाल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी जोरात आरोड्या मारल्या. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावले. मेहुणबारे गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील तीन प्रवाशी जखमी झाले आहेत.
सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे विष्णू आव्हाड यांच्यासह टीमने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.