पिंपरी ३ ( साक्षीदार न्युज ) : – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत ‘नॅक’कडून दिनांक ३० व ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी केल्या गेलेल्या चौथ्या मूल्यमापनात ‘ए++’ मानांकन मिळाले.सदर नॅक समकक्ष समितीवर अध्यक्ष म्हणून प्रो.विमला येरामिल्ली (उत्तर प्रदेश), सदस्य म्हणून प्रा.डॉ.सत्यभामा कुलथू (तामिळनाडू) व सदस्य समन्वयक म्हणून प्रो.डोमिनिक डेव्हीडप्पा (कर्नाटक) हे उपस्थित होते.
महाविद्यालयात पदवी पातळीवर कला, वाणिज्य, विज्ञान, बी-व्होक (मास कम्युनिकेशन) या शाखांमध्ये अध्ययनाची सुविधा आहे, तर पद्युत्तर पातळीवर एम. ए. मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र, एम. एस्सी. भूगोल, रसायनशास्त्र,सूक्ष्मजीवशास्त्र, एम. कॉम. या शाखांमध्ये अध्ययनाची सुविधा आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार व कार्याचा वसा व वारसा हे महाविद्यालय गेल्या ४० वर्षांपासून चालवित आहे
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कोर्सेसच्या माध्यमातून उद्योग-व्यावसायिक बनविण्यासाठीचे उपक्रम, संशोधनास चालना मिळण्यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून देण्यासाठी ‘आविष्कार’सारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना संधी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकसेवक बनविण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, हे आणि यासारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, नृत्य, नाट्य, संगीत यासारख्या विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. त्यात मानाचा तुरा म्हणून महाविद्यालयास चौथ्या मूल्यमापन व मूल्यांकन प्रक्रियेत ‘ए++’ (सी.जी.पी.ए. ३.६१) मानांकन मिळाले आहे.
महाविद्यालयाचा हा चढता आलेख राखण्यात प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी बहुमोल कष्ट घेतले. ऑगस्ट २०२२ मध्ये प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यास गती मिळाली. त्यांच्या निवृत्तीनंतर प्राचार्य प्रोफेसर डॉ. माधव सरोदे यांनी ती धुरा समर्थपणे सांभाळली व महाविद्यालयास सर्वोच्च असलेले हे ‘ए++’ मानांकन मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
या मानांकनात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवारसाहेब, संघटक डॉ. अनिल पाटील, चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, सचिव मा. विकास देशमुख,सहसचिव मा. प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, संस्थेचे विविध पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. संजोगजी वाघेरे पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर, बाळासाहेब वाघेरे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, डॉ. मृणालिनी शेखर, प्रा. अनिकेत खत्री, प्राध्यापक, आजी विद्यार्थी,माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर सेवक या सर्वांचे अनमोल सहकार्य मिळाले. या सर्वांच्या परिश्रमातून महाविद्यालयास मिळालेल्या ‘ए++’ मानांकनाबद्दल समाजाच्या विविध स्तरातून प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांचे अभिनंदन होत आहे.