साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्यावर सर्वच विरोधकांनी टीका करण्याची एक देखील संधी सोडत नसताना आता शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
आ.रोहित पवार म्हणाले कि, अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्या मतदारसंघातील कामाला निधी देण्यात येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार पवार यांनी केला आहे. अजित पवार यांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाच्या 9 आमदारांना मंत्रीपद देण्यात आले. तसेच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळाले आहे. तसेच नुकतेच त्यांना पुण्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले आहे. त्यामुळे राजकारणात अजित पवार यांचा दबदबा वाढत आहे. तसेच आमदार रोहित पवार सातत्याने भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधतात. मात्र, अनेकदा अजित पवारांवर बोलण्याचे, थेट टीका करण्याचे ते टाळतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचे काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झाले आहे. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही. दुसरे म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?, असा सवालही रोहित पवार यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.