साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | राज्य सरकारला ४० दिवसाचा अवधी देवून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर सरकारने कुठलाही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आ.रोहित पवारांनी देखील आता मोठा निर्णय घेतला आहे.
रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु झालीये. अशातच आता संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना समर्थन दिलं आणि एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, युवा संघर्ष यात्रा सणसवाडीमध्ये प्रवेश करताच नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि टाळ मृदंगाच्या तालावर भजन गात स्वागत केलं. तसंच ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी सत्कार केला. यावेळी भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रोहित आरआर पाटील, विकास लवांडे, देवदत्त निकम, इतर सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.