साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक मोठ्या शहरात कंपनीला आग लागल्याच्या घटना घडत असतांना दि.३ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसरात सकाळी 11 च्या सुमारास ब्लू जेट हेल्थकेअर फार्मा कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत तब्बल 11 जण बेपत्ता झाले होते. यापैकी 7 जणांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या हाती लागलेत. या घटनेला 24 तास उलटले तरी चौघांचा शोध लागलेला नाही.
शुक्रवारपासून आमची शोध मोहीम सुरू आहे. रात्रभर शोध सुरू असताना 3 जणांचे मृतदेह सापडले. शनिवारी सकाळी 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत इतर 7 जण जखमीही झाले असल्याची काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तर गॅस गळतीमुळे कंपनीत ठेवलेल्या केमिकलचा लागोपाठ स्फोट झाले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी आग आटोक्यात आणली. कंपनीने या घटनेवर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.