साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | भरधाव वेगाने येत समोरून येणाऱ्या दुचाकीला कट मारणाऱ्याला जाब विचारल्याने तीन जणांना जातीवाचक शिवीगाळ करीत त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार, १५ रोजी रात्री काट्याफाईल रिक्षा थांब्याजवळ घडली. या प्रकरणी १६ रोजी दोन जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरमधून विक्रम राजू सारवान (३२) व विक्रम प्रताप बेंडवाल हे दुचाकीने जात असताना काट्याफाईल रिक्षा थांब्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने कट मारला. तसेच दोघांना अश्लील व जातीवाचक केली. शिवीगाळ का करत आहे, असे विचारले असताना दोन जणांनी सारवान व बेंडवाल यांना मारहाण केली. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आकाश राजू मिलांद यांच्याही डोळ्यावर मारून दुखापत केली. या प्रकरणी विक्रम सारवान यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले करीत आहेत.