साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एका परिसरातील घरासमोर उभे असलेले मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्रीनगर परिसरातील रहिवासी महेश मुरलीधर मंधान ( वय ५८) यांच्याकडे असलेले मालवाहू वाहन (क्र. एमएच १९, बीएम २९३७) त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी घरासमोर उभे केले होते. त्या वेळी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे असलेल्या वाहनाने अचानक पेट घेतला. मालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झाले. या प्रकरणी मंधान यांनी शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.