साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त रामटेक गड मंदिरावरून परत येत असताना दोन युवकांना ऑनलाइन १० हजार रुपयेही लुबाडत होमगार्ड व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीमध्ये विवेक विश्वनाथ खोब्रागडे या युवकाचा मृत्यू झाला. तर फैयाज यासीन पठाण हा जखमी झाला. मनीष भारती रा. अंबाडा (रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.सीतापूर (पवनी) येथील विवेक खोब्रागडे व फैजान पठाण हे दुचाकी (एमएच ४० सीबी ६४९७) ने गड मंदिरावरून पवनीकडे रात्रीला निघाले होते. दरम्यान होमगार्ड मनीष भारती हा त्याची दुचाकी मोपेड (एमएच४०-बीसी २६०९) घेऊन रस्त्यावर उभा होता. त्यासोबत पाच ते सहा साथीदार होते. त्याच्या दुचाकीला कोणीतरी कट मारली होती. त्यात मनीषची पत्नी व मुलीला किरकोळ इजा झाल्याचे समजते. त्या दोघीही घटनास्थळी नव्हत्या. दरम्यान विवेक खोब्रागडे व फैजान हे त्यांच्या मोटरसायकलने पवनीकडे जात होते. त्यांना थांबवून काही न समजण्याआधीच दोघांनाही बेदम मारण्यास सुरुवात केली. मनीष या दोघांचेही काहीही ऐकून घेत नव्हता. तसेच पैसे दिले नाही तर पेट्रोलने त्यांना पेटवून देण्याचीही धमकी दिली.
काही वेळानंतर आरोपी मनीष व त्यांच्या साथीदारांनी मारणे थांबविले. तसेच गाडीची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा फैजान याने त्याचा भाऊ रेहानला फोन करून पवनीवरून बोलावले. रोख नसल्यामुळे नंतर पैसे देऊ, असे सांगितले. तेव्हा त्याने रोख नाही तर ऑनलाइन कर असे सांगितले. त्याने जितेंद्र गजेंद्र गिरी यांचे नावावर फोन पे करण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन पैसे दिले. हा प्रकार घडल्यानंतर फैजान याने विवेकला घरी आणले. रात्री झालेला प्रकार त्यांनी कुणालाही सांगितला नाही. सकाळी विवेकने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कामठी किंवा नागपूर येथे हलविण्याची सल्ला दिला. त्यानुसार नागपूरकडे जात असताना त्याने वाटेतच सकाळी ९ च्या दरम्यान मृत्यू झाला. विवेकची आई नसून तो एकटाच मुलगा होता. त्याला एक लहान बहीण आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.