साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील मित्र मंडळाने बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती घेवून येत असताना वाहनाचा अपघात होऊन मूर्ती अंगावर पडल्याने संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मुक्ताईनगरजवळील पूरनाड फाट्यानजीक शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. देवीच्या स्थापनेची संपूर्ण तयारी झालेली असताना या तरुणावर काळाने झडप घातल्याने जळगावातील जोशी वाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरातील काही कार्यकर्ते देवीची मूर्ती घेण्यासाठी शनिवारी बऱ्हाणपूर येथे गेले होते. मूर्ती घेवून परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती नेमकी संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याखाली तो दाबला गेला. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.