साक्षीदार | २७ नोव्हेबर २०२३ | भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील नवलनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी शनिवारी दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. रोहित दिलीप काकुळते (वय २६, रा. निमगूळ ता. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर ते धुळे रोडवरील नवलनगर जवळ एमएच १८ एबी ८००१ क्रमांकाच्या कार चालकाने भरधाव वेगाने येत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला धडक दिली. अपघाताची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात रोहित दिलीप काकुळते (वय २६, रा. निमगूळ ता. धुळे) हा तरुण कारच्या धडकेमुळे दूरवर फेकला गेला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत रोहित काकुळते याचा भाऊ शेखर दिलीप काकुळते (रा. निमगूळ ता. धुळे) याने धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.