साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. ४० वर्षीय प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नापिंप्री येथील पांडुरंग मन्साराम पाटील (४०) व चेतन अरुण पाटील (१६) हे दोघे दुचाकीने धुळ्याकडे जात असताना पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात चेतन अरुण पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग मन्साराम पाटील हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
यात चेतन पाटील जागीच ठार झाला तर पांडुरंग पाटील हे गंभीर जखमी झाले. पांडुरंग पाटील यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने धुळे रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. मयत चेतन पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. चेतन हा कॉलेज करून मोलमजुरी करीत होता. आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी आई-वडिलांना मदत करीत होता. चेतनच्या अशा अपघाती मृत्यूमुळे रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावांत शोकाकुल वातावरण होते. पारोळा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.