साक्षीदार | २५ ऑक्टोबर २०२३ | दसऱ्याच्या दिवशी राज्याच्या राजकारणात तीन दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर भाजप महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी दिली होती. यातही उद्धव ठाकरे यांच्या गटाची सभा देखील जोरदार झाली यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.
आजचा मेळावा काय सांगतोय तर ‘अब की बार ठाकरे सरकार’. महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा. भाजपचा भ्रष्टाचार आज शिष्टाचार झाला आहे. कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, उलटे लटकावू म्हणतात; पण सगळ्यांना भाजपात सामील करून घेतात. सध्या वाघनखांची चर्चा आहे; पण त्यातही घोटाळा आहे. महाराष्ट्रातील खरी वाघनखे इथे समोर बसली आहेत. आता ५ राज्यांत भाजपचा पराभव होणार आहे आणि ही समोर बसलेली वाघनखे २०२४ मध्ये तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.
शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले, आज सकाळी पत्रकारांनी मला विचारले की, शिवसेनेचे दोन मेळावे होताहेत, तेव्हा मी म्हटले, शिवसेनेचा एकच मेळावा होत आहे. तिकडे तर चायनीज माल आहे, अशा डुप्लिकेट मालाकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही. इकडे शिवतीर्थावर मराठा तितुका मेळवावा, तर तिकडे मराठा तितुका लोळवावा सुरू आहे. केवळ महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. मागील दसरा मेळाव्यावेळी मी तुरुंगात होतो १०० दिवस जेलमध्ये होतो; पण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक तुटला नाही की मोडला नाही. हा बाळासाहेबांनी तयार केलेला निखारा आहे, असे राऊत म्हणाले. भाजपच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करताना राऊत म्हणाले, अजित पवारांनी ७० हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा तर राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचे मोदी जाहीर भाषणात सांगतात आणि लगेच सत्तेत सामील करून घेतात.
मंत्री हसन मुश्रीफांनी आजच कबुली दिली की, भाजप मला तुरुंगात टाकणार होते, म्हणून मी भाजपसोबत गेलो. प्रताप सरनाईक, भावना गवळी, राहुल कुल, दादा भुसे अशी किती भ्रष्टाचाऱ्यांची नावे सांगू. मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागात १०० कोटींची खोटी बिले काढून डांबर घोटाळा केल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हाच एक मोठा घोटाळा असून भाजपमध्ये जाऊन महाघोटाळा झाला. आता तिकडे छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपवाले म्हणताहेत की, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही जेलमध्ये घालू पण इथे महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मात्र मंत्रीपदाची खिरापत वाटताहेत, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली..