ACB Pollution Control Board | साक्षीदार न्यूज | जळगावमध्ये मोठी कारवाई करत लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली आहे. प्रमाणपत्रासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी 15 हजारांची लाच तो खाजगी पंटरामार्फत स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. या घटनेने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपीचे नाव राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (42, निवासी – नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) असे असून त्याच्यासोबतचा खाजगी पंटर मनोज बापू गाजरे मात्र पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण
रावेर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तक्रारदार मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. हॉस्पिटल मालकाने 16 मार्च रोजी जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी जळगाव प्रदूषण मंडळाकडे अर्ज केला होता. अर्जात आक्षेप घेतल्यानंतर पुढे नाशिक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यात आला आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी आवश्यक प्रमाणपत्र मिळाले. मात्र, जळगाव कार्यालयातील दाखल अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार 11 सप्टेंबर रोजी गेले असता, अधिकारी सूर्यवंशी यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने त्याला नकार देत जळगाव एसीबीकडे 23 सप्टेंबरला तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.
24 सप्टेंबर रोजी खाजगी पंटर गाजरे याने फोन पे अॅपद्वारे पैसे स्वीकारले. मात्र तो पळून गेला आणि सूर्यवंशीला एसीबीने अटक केली.
झडतीत घबाडाचा शोध
सूर्यवंशीच्या कार्यालयातून सव्वा दोन लाख रुपयांचे सूर्यवंशी यांच्या बॅगेत सापडले असून ते जप्त करण्यात आले. तसेच नाशिक येथील त्याच्या घरीही झडती घेण्यात येत असून त्यातून अधिक मोठ्या मालमत्तेचा शोध लागण्याची शक्यता आहे.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सोबत पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, नाईक बाळू मराठे आणि शिपाई भूषण पाटील यांनी सहभाग घेत सापळा यशस्वी केला.