साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | देशभरात आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीची अनेक राजय्त जोरदार तयारी सुरु असतांना अनेक दिग्गज नेत्यांसह अभिनेत्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु असतांना आता सिने अभिनेत्री माधुरी दीक्षितला केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
भाजप नेत्या पूनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून माधुरी किंवा विनोद तावडे यांना उमेदवारी मिळेल, असा दावा या या प्रकरणी केला जात आहे. पण भाजपच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष पातळीवर अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करत या चर्चेतील हवा काढली आहे. लोकसभेची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय केंद्रातील नेतेच घेतील, असे ते म्हणालेत.
गत अनेक दिवसांपासून माधुरी दीक्षित भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील एका मतदार संघातून उमेदवारी दिली जाईल असा दावाही करण्यात आला. पण आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने माधुरी दीक्षित यांना उमेदवारी देण्याचा पक्षाचा कोणताही हेतू नसून, त्या स्वतःही भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे माधुरी दीक्षित यांनीही काही महिन्यांपूर्वी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेचे खंडन केले होते. तूर्त तरी माझा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही इरादा नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. पण त्यानंतरही त्यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला नाही. आता भाजपच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यानेच या प्रकरणी स्पष्टोकीत देऊन हे वृत्त फेटाळले आहे. यामुळे आता या विषयावर पडदा पडण्याची शक्यता आहे.