साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून आज त्यांची चिपळूण येथे खळा बैठक झाली असून त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, पक्ष, नाव चोरणारे हे पण चोरणार का? निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. किती मास्क लावून फिराल? किती देखावा कराल? त्यापेक्षा जी करताय ती अॅक्टिंग करा. पण हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही. 31 डिसेंबरला सरकार जाणार म्हणजे जाणार, असा पुनरुल्लेखही आदित्य ठाकरेंनी केला. राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत असल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, जिथून त्यांना पगार येतो तिथे हे करावेच लागणार ना.
आदित्य ठाकरे म्हणाले, नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार होती. हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा होता, पण उद्घाटन केले नाही. मी ट्विट केल्यानंतर उद्घाटन झाले. बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची आठवणही मी ट्विट केल्यावर आली आणि बोनस द्यावा लागला. मुंबईतला डिलाईन रोड 15 दिवसांपासून तयार होता, आमच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकही (एमटीएचएल) पूर्ण तयार आहे. जे 5 टक्के काम राहिल्याचे दाखवतात ही सरकारी यंत्रणेची जादू असते. यात रंगरंगोटी दाखवतात, डागडुजी बाकी असल्याचे म्हणतात. पण एमटीएचएल पूर्ण तयार आहे, पण महाराष्ट्रासाठी वेळ नसणारे इतर राज्यात प्रचाराला व्यस्त असल्याने उद्घाटन उशिरा होत आहे.