साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | दिवाळी सण येत्या काही दिवसावर येवून ठेपला असतांना आज देखील शेतकऱ्यांची दिवाळी दुखात असतांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकाेल्यातील एका पीक विमा कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना गुरुवारी घडली असून कार्यालयातील खुर्च्या, टेबलचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात जिल्हा प्रशासनासह शासन कुचकामी ठरल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदचे गटनेता गोपाल दातकर हे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
दातकर यांच्या आंदाेलनास शेतक-यांचा माेठा पाठींबा मिळू लागला आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट एका पीक विमा कार्यालयावर धडक दिली. तेथे घाेषणाबाजी करीत तोडफोडीस प्रारंभ केला. आगामी काळात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा प्रशासनास सचिन बहाकर (शिवसैनिक, उद्धव ठाकरे गट) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.