साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांना आंदोलनकर्त्यांचा मोठा फटका बसला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आ.सोळंके यांच्या घरावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. यात आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व गाड्या आंदोलकांनी पेटवल्या. या प्रकरामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
आ.सोळंके यांनी ही दुर्देवी घटना असल्याचे म्हटले आहे. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. तरी देखील राजकीय खोडसाळपणातून हा प्रकार झाला असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. राजकीय द्वेषातून वातावरणाचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार असल्याचे सोळंके यांनी म्हटले आहे. मराठा समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे.