Health Scam साक्षीदार न्युज । पैसे कमविण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही . आपण दररोज नवनवीन बातम्या आपल्याला एकायला मिळत असतात आज अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागात एक असामान्य आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच हादरून सोडले आहे. आग्रा जिल्ह्यातील एका महिलेच्या नावाने 30 महिन्यांच्या आत 25 वेळा प्रसूती झाल्याचा दावा नोंदवला गेला आहे. याच कालावधीत तिची 5 वेळा नसबंदी करण्यात आली, तरीही ती पुन्हा गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या योजनेतून गर्भवती महिलांना प्रसूतीनंतर ग्रामीण भागात 1,400 रुपये आणि शहरी भागात 1,000 रुपये दिले जातात. तसेच, नसबंदी झालेल्या महिलांना 2,000 रुपये थेट खात्यात जमा केले जातात. आग्र्याच्या फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात आर्थिक तपासणी सुरू असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या महिलेच्या नावाने 25 प्रसूती आणि 5 नसबंदींसाठी एकूण 45,000 रुपये दिल्याचे नोंदले गेले आहे, जे संशयास्पद वाटते.
या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फतेहाबाद केंद्राच्या अधीक्षकांच्या कार्यपद्धतीचीही चौकशी होणार आहे. आग्र्याचे मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल, ज्यामध्ये तांत्रिक चूक की जाणूनबुजून हा घोटाळा झाला, याचा शोध घेतला जाणार आहे. या प्रकरणाची सत्यता समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.