Tapi Irrigation | साक्षीदार न्यूज । तापी पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचार, बनावट कागदपत्रे व कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या अजय भागवत बढे यांना थेट जिवे मारण्याची धमकी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन यांनी दिली आहे.
ही धक्कादायक घटना दिनांक २२ सप्टेंबर रोजी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाजवळ घडली.
तापी पाटबंधारे विभागाच्या गैरप्रकारबाबत अजय बढे यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार चौकशी करणारे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी अजय बढे दुपारी १२ वाजता गेले होते.मात्र, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता श्री.भोसले कार्यालयात नसल्याने बढे तेथून बाहेर पडत असताना खालच्या मजल्यावर असलेल्या जळगाव पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाचे अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उभे होते.
अजय बढे यांना पाहताच महाजन यांनी “आमच्या विरोधात तक्रारी करतोस का… तुझा कार्यक्रम लावून टाकतो, जीव वाचणार नाही तुझा” असे उघडपणे धमकाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अजय बढे यांनी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा तक्रार अर्ज देवून अधिक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकारी यांच्यापासून स्वतः व कुटुंबीयांच्या जीवाला गंभीर धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.
जुन्या प्रकरणांचाही संदर्भ
शेततळ्याचे कामे मिळवून देतो असे अमिष देऊन सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकारी यांनी मिळून अजय बढे यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी जामीनावर आहेत.
अशाच प्रकारे बोदवड उपसा सिंचन योजनेतील वाळू तस्करी व शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक या प्रकरणातहीअजय बढे यांनी पुराव्यासह तक्रारी केल्याने अमळनेरचे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केली आहे.
पोलिसांवर ढिलाईचा आरोप
अजय बढे यांनी याआधी १३ मार्च रोजीही संबंधितांकडून जीवाला धोका असल्याने जीवित संरक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई न झाल्याने आरोपी अधिक बळकट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “जर माझ्या जीवाला काही अनिष्ट झाले तर त्याची जबाबदारी महाजन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“भ्रष्टाचार उघड करणाऱ्याला उघडपणे जीवघेणी धमकी देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी सर्वत्र होत आहे.