साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी झाल्यापासून राज्यातील प्रत्येक जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे पण मागील तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने रुग्णवाहिका चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील चालकांचा समावेश आहे. चालकांच्या संपामुळे अत्यव्यस्थ रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याची स्थिती बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयमधील १०२ या रुग्णवाहिकावरील चालकांनी अचानक संप पुकारला आहे. या चालकांना मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने तसेच सात वर्षांपासून पीएफ सुद्धा मिळाला नसल्याने त्यांच्या या मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे पाहायला मिळत आहे.
१०२ या रुग्णवाहिका वरील चालक हे रात्रीबेरात्री रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र त्यांना दिवाळी तोंडावर असताना देखील वेतन मिळाले नाही. तर काहींना बारा वर्ष उलटून गेली तरीही त्यांचा पीएफ देण्यात आला नाही. या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चालक हे अतिशय तुटपुंजा पगारावर काम करत असताना ते सुद्धा मिळत नसल्याने त्यांनी हा संप पुकारला आणि पगार देण्याची मागणी केली.