साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | काम सोडल्यावर पुन्हा कामावर येत नसल्याने चोरीचा आरोप लावण्याची धमकी दिल्याने येथील किशोर बाबूराव जैन (वय ४०) या प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी सराफ दुकानमालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सात महिन्यांपासून भारती ज्वेलर्स या सोने-चांदीच्या सराफा दुकानावर कामास असलेला किशोर याने पूर्ववत कामावर यावे, यासाठी दुकान मालकांनी तगादा लावला होता. त्यासाठी किशोर जैन (रा. कासार गल्ली) व त्याची आई तसेच त्याच्या भावाच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधत दुसरीकडे कामाला लागल्यास चोरीचा आरोप लावून जीवनातून उठवून टाकण्याची धमकी दिली. याचबरोबर चापटाबुक्क्यांनी मारहाण ही केली. अशा प्रकारे संबंधित सराफा व्यावसायिक असलेल्या दोन्ही भाऊ व त्यांचे वडील या तिघांच्या त्रासाला कंटाळून किशोर बाबूराव जैन या अविवाहित प्रौढाने २७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रथचौकातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मालक करण महेश गणवानी, अनुराग महेश गणवानी व महेश देवणदास गणवानी (सर्व रा. स्टेशनरोड रावेर) यांच्या विरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले हे पुढील तपास करीत आहेत