साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | मित्रासह दुचाकीने कामावरून घरी जात असताना वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात विशाल राजेंद्र सपकाळे (२१, रा. देव्हारी ता. जळगाव) हा तरुण ठार झाला तर विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला. हा अपघात उमाळा फाट्याजवळ शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी रात्री झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऐन दीपोत्सवात मुलाचा मृत्यू झाल्याने सपकाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत विशाल सपकाळे हा तरुण वेल्डर म्हणून कामाला होता. दि. १० नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी तो त्याचा मित्र विशाल गुळवे सोबत दुचाकीने (क्र. एमएच १९, ५६१३) कंपनीतून देव्हारी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. तालुक्यातील उमाळे फाट्याजवळ वळणावर त्यांची दुचाकी घसरली. यात विशाल सपकाळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.