साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | नातेवाइकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी शहरातील एका कापड दुकानावर आलेल्या पती पत्नीत घरगुती कारणावरून वाद उद्भवला आणि पतीने पत्नीला तू घरी ये, तुला पाहतोच असे म्हणत रस्त्यावरच मारहाण केली. ही घटना १८ नोव्हेंबर शनिवार रोजी संध्याकाळी शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्नाच्या बस्त्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबतच पत्नीचे भाऊ, भावजयी यांच्यासह इतर नातेवाईकही होते. पती मद्यपान करून आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. त्यावेळी पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली. नातेवाइकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद सुरूच राहिला. अखेर हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे पत्नीने थेट पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यावेळी पतीनेही पत्नीसह नातेवाइकांनीदेखील मारहाण केल्याचा आरोप केला. बस्ता ज्या दुकानात घ्यायला गेले तेथे न घेता दुसऱ्या दुकानातून घेऊ, असे मी सांगत होतो, त्यावरून मला मारहाण केल्याचे पतीचे म्हणणे होते.








