Ashok Kharat | साक्षीदार न्यूज | राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवे धागेदोरे समोर येत असून, आता या प्रकरणाची झळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही बसू लागली आहे. राजकीय नेत्यांनंतर आता प्रशासनातील अधिकारीही चौकशीच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) येथे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती तातडीने रद्द करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने २४ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात आदेश जारी करत त्यांना तत्काळ पदमुक्त केले.
या आदेशानुसार, अभिजीत भांडे पाटील यांना सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करून मंत्रालयातील महसूल व वन विभागात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अचानक झालेल्या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तपासादरम्यान अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खरातच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनींमध्ये गुंतवणूक केल्याचे आरोप समोर आले असून, आर्थिक व्यवहारांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरातशी संपर्कात असलेल्या व्यक्तींवर चौकशीचा फास आवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधीच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या खरातशी संबंधित एका ट्रस्टमध्ये संचालिका असल्याचे समोर आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले असून, संबंधित सर्व राजकारणी व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, पोलीस तपासात अशोक खरातच्या कारवायांची व्याप्ती मोठी असल्याचे उघड होत आहे. ‘एल्विश हनी’ नावाने मध विक्रीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुर्कीतील समुद्रातील गुहेतून आणल्याचा बनाव करून हे मध प्रति किलो तब्बल ९ लाख रुपयांना विकले जात होते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








