साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | येत्या काही दिवसावर दिवाळी हा सण येवून ठेपला आहे तर दुसरीकडे गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात होत आहे, याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना देखील बसू लागला आहे. आता एलपीजीच्या दरांत तब्बल 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं तुमच्यासाठी महाग होणार आहे. आज, 1 नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते.