ATM Withdrawal Charges साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । 1 मे 2025 पासून ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ATM व्यवहार शुल्कात वाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे मोफत व्यवहार मर्यादेनंतर प्रत्येक ATM व्यवहारासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागेल. ही शुल्कवाढ विशेषतः वारंवार ATM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खिशाला झळ बसवणारी ठरू शकते.
नवे शुल्क किती असेल?
सध्या मोफत मर्यादेनंतर ATM मधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, 1 मे 2025 पासून हे शुल्क वाढून 23 रुपये प्रति व्यवहार होईल. म्हणजेच, प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ग्राहकांना 2 रुपये जास्त मोजावे लागतील. विशेषतः जे ग्राहक महिन्यातून अनेकदा ATM वापरतात, त्यांच्यावर या वाढीचा आर्थिक भार पडेल.
मोफत व्यवहार मर्यादेत बदल नाही
RBI ने मोफत व्यवहार मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या ATM मधून दरमहा 5 मोफत व्यवहार आणि इतर बँकांच्या ATM मधून मेट्रो शहरांमध्ये 3, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येतील. ही मर्यादा ओलांडल्यानंतरच नवीन शुल्क लागू होईल.
लहान बँकांचे ग्राहक का अडचणीत?
तज्ज्ञांच्या मते, लहान बँकांच्या ग्राहकांवर या शुल्कवाढीचा सर्वाधिक परिणाम होईल. लहान बँकांकडे स्वतःचे ATM नेटवर्क मर्यादित असते, त्यामुळे त्यांचे ग्राहक मोठ्या बँकांच्या ATM वर अवलंबून असतात. मोफत मर्यादा संपल्यानंतर या ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी जास्त शुल्क द्यावे लागेल. यामुळे काही ग्राहक मोठ्या बँकांकडे वळण्याचा विचार करू शकतात.
शुल्कवाढीमागचे कारण काय?
बँका आणि थर्ड-पार्टी ATM ऑपरेटर्सनी गेल्या काही वर्षांपासून शुल्कवाढीची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, ATM चालवण्याचा खर्च वाढला असून, सध्याच्या शुल्कातून तोटा होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने RBI ला शुल्कवाढीची शिफारस केली, जी आता मंजूर झाली आहे. त्यामुळे 1 मे 2025 पासून हे नवे शुल्क लागू होईल.
जास्त शुल्क टाळण्यासाठी काय कराल?
ATM शुल्क वाढीचा फटका बसू नये यासाठी काही सोप्या टिप्स
-
मोफत मर्यादेचा जास्तीत जास्त वापर: तुमच्या बँकेच्या ATM मधून 5 आणि इतर बँकांच्या ATM मधून मर्यादित मोफत व्यवहारांचा लाभ घ्या.
-
डिजिटल पेमेंटला प्राधान्य: UPI, मोबाईल वॉलेट किंवा कार्ड पेमेंट वापरून रोख रकमेची गरज कमी करा.
-
कमी व्यवहार: प्रत्येक वेळी जास्त रक्कम काढा, जेणेकरून वारंवार ATM वापरण्याची गरज पडणार नाही.
या पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्ही वाढलेल्या शुल्काचा बोजा कमी करू शकता.