साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३
गेल्या दोन वर्षापासून देशासह विदेशात आपल्या दरबाराच्या माध्यमातून चर्चेत आलेले आध्यात्मिक गुरू बागेश्वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे गेल्या सहा महिन्यापासून राज्यातील प्रवास वाढला आहे. त्यांच्या भक्त परिवार देखील मोठ्या संख्येने एकत्र येत असतांना आता छत्रपती संभाजी नगरात देखील बाबांचा दरबार होणार असल्याची माहिती आली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे ५ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. ६ ते ८ नोव्हेंबर हे तीन दिवस आयोजित कथेत राज्यभरातून १० लाख भाविक येतील, यादृष्टीने स्टेशनरोडवरील अयोध्यानगरीत ४० एकरवर भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. युवकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, शिरीष बोराळकर यांच्यासह सर्व सकल हिंदू संघटनेचे पदाधिकारी हजर होते. निमंत्रक व स्वागताध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले की, मराठवाड्यात पहिल्यांदा धीरेंद्र शास्त्री महाराजांची हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्यानगरीत हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबरला सायंकाळी विमानतळावर महाराजांचे आगमन होईल. त्यानंतर वाहन रॅली काढण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता हनुमान कथेला सुरुवात होईल. ७ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान कथा आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेदरम्यान दिव्य दरबार भरणार आहे. ८ नोव्हेंबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान हनुमान कथा होऊन या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. अयोध्यानगर मैदानावर १० लाख भाविक येणार असल्याने त्यादृष्टीने विविध समित्या तयार करून नियोजन केले जात आहे. आयोजनात सकल हिंदू जनजागरण समितीअंतर्गत सर्व जाती-धर्मातील संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत.