ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सखाराम तुकाराम पाटील फदाट यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन.
Bapu जाफ्राबाद (साक्षीदार न्युज) :- गांधीवादी विचार व प्रेमळ स्वभावामुळे संपूर्ण जाफराबाद तालुक्यात ‘बापू’ या नावाने सुपरीचीत असलेले सखाराम बापू १ डिसेंबर २०२४ रोजी ११ अकरा वाजता अनंतात विलीन झाले.
सखाराम बापू यांचा जन्म बोरगाव.बू तालुका जाफराबाद येथे झाला. त्यांचे वडील तुकाराम फटाट हे निजाम शासनाविरुद्धच्या चळवळीत सहभागी होते.वडिलांच्या पश्चात सखाराम बापू तरुण वयातच निजाम शासनाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय झाले.बापूंच्या हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचा स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
सखाराम बापू यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बोरगाव बुद्रुक गावाच्या सरपंच पदापासून झाली. गावाच्या विकासासाठीची त्यांची धडपड व सर्वांच्या सुखदुखात धावून जाण्याच्या त्यांचा स्वभावामुळे गावकऱ्यांनी त्यांना सलग 40 वर्ष सरपंच पदी निवडून दिले. बाहेर गावातील लोक बोरगाव गावाला “बापुच बोरगाव” म्हणूनही ओळखले जाते.
सखाराम बापूंनी जाफराबाद तालुका पंचायत समितीचे सभापती पदही भूषवले व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जाफराबाद तालुक्यात अनेक विकास कामे केली .तसेच, बापूंनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य पदही भूषविले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वेगळा जालना जिल्हा निर्मितीसाठी खूप प्रयत्न केले. मराठवाड्याचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी बापूंनी त्याकाळी वेगळे मराठवाडा राज्य निर्मिती करण्याची मागणी केली होती व त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
दिनांक २ डिसेंबर रोजी सखाराम बापूंवर बोरगाव बु् येथे अंतिम संस्कार करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक स्वातंत्र सैनिकाला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. सखाराम बापूंचे कार्य लक्षात घेऊन शासनाद्वारे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
याप्रसंगी शासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदार सारिका भगत व पोलीस निरीक्षक श्री.इंगळे साहेब व पोलिसांच्या टीमने बापूंना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अंतिम निरोप दिला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. इंगळे व अनेक मान्यवरांनी बापूंच्या हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी राजकीय व सर्वच क्षेत्रातील प्रमुख मान्यवर मंडळी व जनसमुदाय बापुंना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता.
बापूंच्या निधनाने जाफराबाद तालुक्याच्या राजकीय इतिहासातील एक तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.