साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरातील नारायणनगर येथे एका व्यापाऱ्याला व्याजाचे पैसे घेतल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२ च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नारायण नगरातील रहिवासी किशोर उर्फ किरण उखा पाटील (४७) यांचा भाचा उमेश राणे यांनी तेजस सपकाळे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या कारणावरून गौरव बढे (रा. खळवाडी, भुसावळ) याने किशोर पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडासारख्या वस्तूने कपाळावर मारत दुखापत करत धमकीही दिली. हा प्रकार घडल्यानंतर किशोर पाटील यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार गौरव बढे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. रज्जाक खान करीत आहेत.