साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील एका ठिकाणी तीन तरुणांनी दोघांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले व ते पैसे न दिल्याने त्यांनी दोन्ही तरुणांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरातील हुडको येथे एका चहाच्या टपरीवर दि.१३ रोजी सायंकाळच्या सुमारास धनाजे काळे नगरातील रहिवासी महेंद्र नामदेव बडगुजर( वय २०) हा तरुण आपल्या मित्रासह चहा पीत असतांना या ठिकाणी तीन संशयित आरोपी आले असता त्यांनी महेद्र याला दारू पिण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली त्यानंतर या दोघांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्या तिघांनी धारदार सुऱ्याने तरुणाच्या डोक्यावर व त्याच्या मित्राच्या हाताच्या अंगठ्यावर वार करून दुखापत केली यासह त्यांच्या जवळील ५ हजार ६०० रुपये बळजबरीने चोरून नेल्या प्रकरणी तरुणाने जळगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी तीन संशयीताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी संदीप गावित व पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शन पुढील तपास सुरु आहे.