SIP साक्षीदार न्युज । सध्याच्या काळात अनेकांचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न असते. गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनेकांना त्यांच्या पगारातून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूक करून श्रीमंत होण्याची इच्छा असते. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास श्रीमंतीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायची असते, तर काही SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून गुंतवणूक करून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहतात. नियमित बचतीत सातत्य ठेवले, तर चांगली रक्कम जमा होऊ शकते.
SIP म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. या योजनेत महिन्याला ठराविक रक्कम आपोआप खात्यातून वजा होते, ज्यामुळे बँकेत रक्कम जमा करण्याचा ताण जाणवत नाही. सध्या SIP योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे आणि तिला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड फोलिओ २२.५० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो मागील महिन्यात २२.०२ कोटी रुपये होता.
जर तुम्ही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही १,०००, २,०००, ३,००० किंवा ५,००० रुपये महिना गुंतवू शकता.
१,००० रुपयांच्या SIP ने कोट्यधीश कसे व्हाल?
१० टक्के वार्षिक स्टेप अपसह, तुम्ही दर महिन्याला १,००० रुपयांची गुंतवणूक करू शकता, ज्यावर १२ टक्के वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, ३१ वर्षांत तुमच्या खात्यात १.०२ कोटी रुपये जमा होऊ शकतात. तुम्ही एकूण २१.८३ लाख रुपयांची गुंतवणूक कराल, ज्यावर तुम्हाला ७९.९५ लाख रुपयांचा परतावा मिळेल.