Beed Lawyer Family Dead Body Assault साक्षीदार न्युज । अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील एका वकील महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणाने गावात खळबळ उडाली आहे. ही घटना 14 एप्रिल 2025 रोजी घडली असून, यात गावातील सरपंच आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांवर युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आता गावकऱ्यांनी या वकील कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. अॅड. ज्ञानेश्वरी अंजान या वकील महिलेला मारहाण झाल्याचा दावा असला तरी गावकऱ्यांचे म्हणणे आहे की हा प्रकार बनावट असून, या कुटुंबाने मृत आजोबांच्या प्रेताला अमानुष मारहाण केली आणि खोटे गुन्हे दाखल करून गावकर्यांची पिळवणूक केली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने गावातील लोकांवर वारंवार खोटे गुन्हे लादले आहेत. त्यापैकी एक प्रकरणात त्यांनी स्वतःच्या आजोबांच्या मृतदेहाला मृत्यूनंतर तीन तासांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गावातील सात जणांवर खुनाचा (धारा 302) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात हा गुन्हा खोटा असल्याचे उघड झाले असून, पीएम रिपोर्टमध्ये मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे (फुफ्फुस आणि मेंदूच्या सूजेमुळे) झाल्याचे स्पष्ट झाले. तरीही प्रशासनाने या कुटुंबावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, गावकऱ्यांनी दावा केला की या कुटुंबाने घरगुती वादातून एका महिलेकडून विष प्राशनाचा प्रकार बनवला आणि त्यानंतर गावातील तीन जणांवर खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातही नार्को टेस्टद्वारे सत्य बाहेर काढण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एका प्रतिष्ठित गावकर्याने सांगितले की, “जर मी दोषी असलो तर मला फाशी द्यावी, पण हे कुटुंब विनाकारण गावकर्यांची त्रास देत आहे.” त्यांनी यापूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील खोट्या पद्धतीने दाखल करून सात जणांना त्रास दिला, जे नंतर निर्दोष मुक्त झाले.
दरम्यान, मारहाण प्रकरणात अॅड. ज्ञानेश्वरी अंजान यांना सरपंच अनंत अंजान यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे घेतली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. यात सरपंचासह सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास सुरू असून, या कुटुंबावर गावकऱ्यांनी केलेले आरोप खरे आहेत की नाही, हे स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.