साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | नेहमीच क्रिकेटचे मैदानात अनेक सामने होत असतात नुकतेच भारत-पाकिस्तान सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांविरोधात गोंदिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिंधी कॉलोनी संकुलात पोलिसांनी छापेमारी करत तीन बुकींना अटक केली आहे. आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. महादेव बेटिंग अॅपद्वारे ही सट्टेबाजी होत असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक देखील केली आहे. खानचंद संगतानी (वय ४१ वर्षे), भरत भोजवानी (४७ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भारत पाकिस्तान सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी सिंधी कॉलोनी संकुलात छापा टाकला. तेव्हा आरोपी सट्टेबाजी करत असल्याचं पोलिसांच्या नजरेस आलं. याप्रकरणी पोलिसांनी धर्मेंद्र सुरेश ठकरानी या सह तीन क्रिकेट बुकींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
शहरातील सर्वात मोठा बुकी सोंटू (अनंत) जैन याच्यावर कारवाई होत असतानाही गोंदिया शहरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा थांबलेला नाही. सट्टेबाजीचा बाजार लक्षात येताच पोलिसांनी बुकींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी दिनेश लबदे यांच्यासह पोलिसांच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे.