साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या विश्वचषक क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला दि.२१ रोजी गुंडा विरोधी पथकाने दिनेश हरीश शर्मा (वय 38, रा. काळेवाडी) याला अटक केली. अटक केलेल्या बुकीकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. झालेल्या कारवाईने पुण्यात मोठी खळबळ उडाली होती.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली की, निरंकारी भवनजवळ, काळेवाडी येथे एकजण “क्रिकेट लाइव्ह लाइन इन ‘ या सोशल मिडिया ऍपद्वारे बेटिंग घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दिनेश शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख 40 लाख रुपये, दोन मोबाईल फोन आणि एक कल्क्युलेटर असा एकूण 40 लाख 80 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंमलदार पोपट हुलगे यांनी केली.