Amhi Bhadgavkar भडगाव | सागर महाजन | शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘आम्ही भडगावकर’ या ग्रुपच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. शासन स्तरावर अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भडगाव शहरातील विविध विकासकामे आणि सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित असून, नागरिकांना केवळ आश्वासनांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, अशी भूमिका ‘आम्ही भडगावकर’ ग्रुपने घेतली आहे. तसेच, या मागण्यांवर 23 एप्रिल 2026 पर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास, 24 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत
- भडगाव येथे प्रस्तावित आदिवासी विकास प्रकल्प उपकार्यालय तात्काळ सुरू करून आदिवासी बांधवांची गैरसोय दूर करावी.
- तहसिल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या शासकीय जागेत नवीन प्रशासकीय इमारत उभारून त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, Mahatma Jyotiba Phule यांचे स्मारक, तसेच Dr. Babasaheb Ambedkar यांचे स्मारक आणि मा. जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यात यावे.
- 2023 पासून प्रस्तावित असलेला एस.टी. डेपो भडगाव येथे तात्काळ सुरू करण्यात यावा.
या सर्व मागण्या भडगावकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याचे नमूद करत, संबंधित अधिकाऱ्यांनी शासनापर्यंत निवेदन पोहोचवून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.









