ATM Scam Alert | भडगाव | तालुक्यातील वडगाव येथील ८७ वर्षीय वयोवृद्धाची एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रतन वना पाटील (वय ८७, रा. वडगाव ता. भडगाव) हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे काढण्यासाठी भडगाव येथील बडेसर कॉम्प्लेक्समधील एसबीआय बँकेत गेले होते. खात्यात २ लाख ३३ हजार रुपये शिल्लक असल्याची खात्री करून ते बँकेजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएममध्ये पैसे काढताना अडचण येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात तरुणाने “मी मदत करतो” असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्या तरुणाने एटीएम कार्ड घेत पिन नंबर विचारला. तीन वेळा पैसे काढण्याचा प्रयत्न करूनही पैसे निघाले नाहीत, असे सांगत त्या तरुणाने चलाखीने कार्ड बदलून दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले आणि तेथून निघून गेला.
दरम्यान, वृद्ध व्यक्ती घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. ८ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर ते बँकेत गेले. स्टेटमेंट तपासल्यावर त्यांच्या खात्यातून १,२०,०८१ रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बँकेत दिलेले एटीएम कार्ड तपासले असता ते त्यांचे नसून दुसऱ्या व्यक्तीचे असल्याचे आढळले. त्यावर ‘शिबु अधिकारी’ असे नाव असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने आलेल्या अज्ञात तरुणाने कार्डची अदलाबदल करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.









