साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काही भागांमध्ये शांततेत आंदोलन सुरू आहे, याच दरम्यान आज मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीत ज्या मराठा समाजबांधवांकडे कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती, समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या संबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यातच राज्यभरातून मराठा समाजाचा विरोधही अधिकही तीव्र होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने तातडीने बैठक बोलावून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती मांडण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे. या समितीच्या अहवालावरच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीलाही अत्यंत महत्त्व होते. वास्तविक राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे या तातडीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.