साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | दिवाळीच्या शुभेच्छा देत तर भारतीय क्रिकेट संघाच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करीत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य देखील केले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे. आचार संहितेबाबत आयोगाकडून भाजपला फ्रीहीट देण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी बजरंग बलींच्या नावाने मतदान मागितले. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशमध्ये सभेमध्ये राम मंदिराच्या मोफत दर्शनासाठी घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने नियमावलीत बदल केले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आचारसंहितेत निवडणूक आयोगाने बदल केला आहे का? आणि तो केला असेल तर त्याबाबत भाजपला सांगितलं आहे का? आम्हाला का सांगितलं नाही. माझं माझ्या पक्षाला आव्हान आहे की, त्यांनी देखील निवडणुकीमध्ये हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, मंगळमूर्ती गणेश, श्री रामाच्या नावाने मतदान मागावे, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.