BJP
साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | देशात लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी आपली राजकीय गणिते फिरविण्यास सुरुवात केली आहे तर कॉंग्रेस देखील आता मैदानात येत अनेक मतदार संघात जावून जनसंपर्क वाढविन्यावर भर देत आहे. प्रदेश कॉंग्रेसतर्फे राज्यात विभागनिहाय संघटनात्मक पक्षबांधणीसाठी आढावा बैठका घेतल्या जात आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र विभागाच्या बैठकीनंतर मंगळवारी मराठवाडा विभागाची बैठक झाली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधातील आहे. त्यामुळे भाजपला राज्यातून हद्दपार करणे, हीच आमची भूमिका असल्याचे देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. बुथपातळीपर्यंत पक्षबांधणीचे काम सुरु आहे. आतापर्यंत ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरी भागात येत्या महिनाभरात तर ग्रामीण भागात दोन महिन्यांत हे काम शंभर टक्क्यांपर्यंत घेऊन जाऊ असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.