साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | देशभरात आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले असतांना आतापासून कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यात राज्यातील नेते देखील मागे पडलेले नाही. कॉंग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या कि, खाजगी नोकर भरती करण्यासाठी भाजपने आरक्षण रद्द करण्याचा मोठा डाव आखला आहे. त्यासाठीच भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकलाय, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकर भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण रद्द करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भाजपाचा हा कुटील डाव मोडून काढण्यासाठी भाजपच्या या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले आहे, असं प्रणिती शिंदे म्हणल्या.
काँग्रेस पक्षाला जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभेत आणि सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असे आमदार शिंदे यांनी ठामपणे सांगितले. आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासगी नोकर भरतीवरून भाजप सरकारवर निशाणा साधला.